कोल्हापूरमध्ये अतिक्रमण काढल्याच्या रागातून पोलीस निरीक्षकाचं घर पेटवलं

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यात अतिक्रमण काढल्याच्या रागातून थेट पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या घरालाच आग लावल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरमध्ये घडला आहे. या आगीत पतंगे यांचं घर आणि गाडीचं मोठं नुकसान झालं.

या प्रकाराने भुदरगड तालुक्यात खळबळ मजल्यामुळे गारगोटीत मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला असून संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिली.

भुदरगड पोलीस निवासस्थान हद्दीत आरोपी सुभाष देसाईने अतिक्रमण करून दुकान गाळा काढला होता. ते अतिक्रमण पतंगे यांनी हटवलं. त्याचा राग मनात ठेवून आरोपी सुभाष देसाईनं पतंगे यांना धडा शिकवण्याची धमकी दिली. यानंतर त्याने मंगळवार दि. 11 फेब्रुवारी 2020 रोजी मध्यरात्री पतंगे यांच्या निवासस्थानाला आणि गाडीला रॉकेल ओतून आग लावली. हे लक्षात येताच पोलीस निरीक्षक पतंगे बाहेर आले. त्यांनी आरोपी सुभाष देसाईला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.

आरोपी देसाई याला महागाव ता. गडहिंग्लज येथील बहिणीच्या घरातून सकाळी दहाच्या सुमारास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती श्रीनिवास घाडगे यांनी दिली. देसाई हा खुनशी आणि गुंड प्रवृत्तीचा आरोपी आहे. त्याच्याविरोधात नागरिकातून यापूर्वी तक्रारी होत होत्या. पोलिसांकडे या तक्रारी आल्या, तर आम्ही त्यावर कारवाई करू. तसेच पीडितांनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी केलं आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–