कोरोना विषाणू : आजार बरे करणाऱ्या संदेशावर विश्वास न ठेवण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

▪मुंबई : कोरोना विषाणूमुळे झालेला आजार बरा करण्याकरिता समाजमाध्यमांमध्ये सध्या जे संदेश फिरत आहेत, ते पूर्णपणे चुकीचे आहेत. त्या संदेशांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. आरोग्य विभागामार्फत असे संदेश दिले नाहीत. नागरिकांनी अशा संदेशावर, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केले.

▪लसणाच्या पाकळ्या, कढीपत्त्याची पाने, गोमूत्र आदींच्या सेवनामुळे कोरोना विषाणूवर उपचार शक्य असल्याचा संदेश वेगवेगळ्या डॉक्टरांच्या नावाने आणि आरोग्य विभागाचे नाव टाकून समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. हे संदेश पूर्णपणे चुकीचे असून त्यांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. दिशाभूल करणाऱ्या या संदेशांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.

▪ताजे स्वच्छ व पूर्णपणे शिजविलेले अन्न खावे, पोषक आहार घ्यावा, हात धुवावेत, सर्दी किंवा खोकला झाला असल्यास नाका तोंडावर रुमाल ठेवून शिंकावे अशा प्रकारच्या सूचना आरोग्य विभागाने दिलेल्या आहेत.

▪कोरोनावर कुठलेही एक विशिष्ट औषध उपचार नसून लक्षणांवर औषधोपचार केला जातो, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये असेही त्यांनी सांगितले.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–