जाणून घ्या आदिवासी सण बोहाडा बद्दल काही रंजक गोष्टी…

✒श्रुती भास्कर कुलकर्णी ,पर्यावरण अभ्यासक

▪पश्चिम घाट विविध अंगांनी माणसाच्या आयुष्याशी जोडला गेला आहे. नद्यांचे उगम, शेती, जैवविविधता हे तर आहे पण सांस्कृतिकदृष्ट्या ही तो खूप जोडला गेला आणि मुलनिवासी असलेल्या लोकांच्या रूढी, सण आणि परंपरा ह्यात तो खोलवर गेला आहे.

▪होळी ते अक्षयतृतीया ह्या काळादरम्यान साजरा केला जाणारा आदिवासी सण बोहाडा हा ह्याचे उत्तम उदाहरण आहे. गुजरातच्या डांग ते अगदी नगरच्या कळसुबाई पट्ट्यापर्यंत बोहाडा सण साजरा केला जातो तो पुढे कोकणात दशावतार म्हणून ओळखला जातो ते अगदी केरळ पर्यंत कथकली नृत्यप्रकार हा ही ह्या सणांचा भाग आहे. रात्रभर वेगवेगळे मुखवटे लावून विविध कथा नाचत सादर केल्या जातात.

▪बोहाडा हा शब्द बोहाडणे म्हणजे खूप हिंडणे ह्या वाक्य्प्रचारातून आला असावा असा एका अंदाज आहे. कारण बोहाडा हा पदयात्रेसारखा रात्रभर गावभर फिरून साजरा केला जातो.रामायण, महाभारत कथा तसेच काही स्थानिक आदिवासी कथा ह्यात गुंफलेल्या असतात.

▪डांग, नाशिक, पालघर ह्या भागात पेपरमेशचे मुखवटे लावून त्याला साजेशी वेशभूषा करून लोक नृत्यनाट्य करतात. राम-रावण युद्ध. भीम हिडींबा लग्न, मारुती नृत्य, काळभैरी नृत्य, वाघदेवी, रक्ताई नृत्य अशा कथा असतात. प्रत्येक गावाची प्रथा वेगळी. ह्या 3 दिवसापासून 8 दिवस चालणाऱ्या उत्सवात 18 ते 54 इतक्या प्रकारची सोंगे नाचवतात.

▪वैशिष्ट्ये म्हणजे देव, असुर, देवी, राक्षसी सगळी सोंगे पुरुषच नाचवतात. वरवर पाहता पाहता सण असलेला हा उत्सव काही भागात लाखोंची उलाढाल करणारा आणि मुखवटेकार, रंगारी, वाद्य वाजणारे ह्यांच्या वर्षाची बेगमी करणारा हा सण आहे.पालघर जिल्ह्यात मोखाडा, भरसटमेट, करढन ह्या गावात खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–