टिकटोक – साधक की बाधक ?

संपूर्ण जगात कोरोना विषाणूमुळे दहशत पसरली असताना सोशल मिडीयावरील वातावरण वेगळ्याच विषयामुळे तापले आहे. सोशल मिडीया ॲप टिकटोक व युट्यूब यांमध्ये कोण सर्वश्रेष्ठ या बाबतचा हा वाद आहे. अमीर सिद्धीकी या टिकटोक स्टार (?) ने टिकटोक कसे श्रेष्ठ आहे हे सांगतानाचा एक व्हिडीयो पोस्ट केला. यात त्याने युट्यूब व युट्यूबरर्स वर अतिशय अभद्र भाषेत टिका केली. कॅरीमिनाती (खरे नाव अजय नागर) या सुप्रसिद्ध युट्यूबरने या टिकेला त्याच्याच भाषेत सडेतोड प्रतिउत्तर दिले. अल्पवधीतच हा व्हिडीयो तुफान व्हायरल झाला. ‘नॉन साँग’ या श्रेणीत या व्हिडीयोने सर्व उच्चांक मोडीत काढले त्याच बरोबर नेटकऱ्यांनी लाईक व कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पाडला. पण काहीच दिवसात युट्यूबने हा व्हिडीयो त्यांच्या मार्गदर्शक तत्वांत बसत नसल्याचे सांगत युट्यूब वरून हटवला. कॅरीमिनातीचा हा व्हिडीयो युट्युबची पाठराखण करणारा असूनसुद्धा युट्यूबने तो हटवला. इतर युट्यूबर्रनी ही कसर भरून काढत टिकटोकरर्सना चांगलेच धारेवर धरले. मीमरर्स नीही या वादात उडी घेऊन विनोदी मिम्सचा सोशल मीडियावर महापूर आणला.
टिकटोक आणि वाद हे जुनेच समीकरण आहे. टिकटोक आपल्या वापरकर्त्यांच्या सर्व खाजगी माहितीचे संकलन करते असा आरोप होत आला आहे. इतर सोशल मिडीया प्लेटफॉर्म आपल्या वापरकर्तांवर कडक नियंत्रण ठेवतात. मात्र टिकटोक बाबतीत असे दिसत नाही. बलात्कार, सामाजिक तेढ, ॲसिड अटॅक, प्राण्यांवरील अत्याचार अशा वाईट कृत्यांना प्रोत्साहन देणारे अनेक व्हिडीयो टिकटोक वर बिनदिक्कम पोस्ट होत असतात. अशाच एका प्रकरणात एका व्यक्तीने आत्महत्या केल्याने मद्रास उच्च न्यायालयाने केंद्रसरकारला टिकटोकवर बंदी आण्याची सुचना केली होती. त्यानुसार बंदी घातली ही गेली पण अल्पावधीतच उठवावी लागली.
टिकटोक ॲपच्या चांगल्या बाजूही आहेत पण त्या काहीच. आपल्या देशात खुप लोक असे आहेत ज्यांच्या अंगी अनेक कलागुण आहेत पण संधी न मिळाल्याने ते पुढे येऊ शकले नाहीत. या ॲपमुळे अनेकांना आपल्या कलांचे प्रदर्शन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले. ॲपमध्ये पंधरा सेकंदाच्या वेळात नृत्य, गायन अशा कला दाखवून अनेकजन प्रसिद्धीच्या झोतात आले. अनेकांचे दोन घटकांचे मनोरंजन झाले. पण एकूण विचार करता यावर समाजविघातक कृत्यांना प्रोत्साहन देण्याऱ्या व्हिडीयोंचाच जास्त भरणा असल्याने त्याच्या चांगल्या बाजू झाकोळल्या जात आहे.
सध्या चीनमधून आलेल्या कोरोना या विषाणूमुळे भारतीय समाजमन चीनच्या विरोधात गेले आहे. योगायोगाने टिकटोक हे ॲप चीनच्या ‘बाईटडान्स’ या कंपानीने विकसीत केले असल्याने साहजिकच भारतीयांचा त्याच्यावर रोष आहे. त्यातच टिकटोक विरुद्ध युट्युब प्रकरणाने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. भारतीय नेटकऱ्यांनी ‘बॅनटिकटोक’ हा हॅशटॅग ट्वीटरवर ट्रेंड करून टिकटोकला ॲपल ॲप स्टोअर व गुगल प्लेस्टोअर वर चांगलाच दणका दिला आहे. अवघ्या चारच दिवसापूर्वी गुगल प्लेस्टोअरवर 4.5 स्टार असणारे रेटींग 1.2 स्टार वर आणले आहे.( नेटकरी हे रेटींग 1 स्टार पर्यंत आल्याशिवाय शांत बसणार नाहीत ! ) टिकटोकला विरोध म्हणून अनेकांनी आपल्या मोबाईल मधून टिकटोक अनइन्टॉल केले आहे. (ज्यांच्या मोबाईलमध्ये टिकटोक इन्टॉल नाही त्यांनी ॲपला ‘रिपोर्ट’ करून आपला विरोध दर्शविला आहे !)
एकूणच काय तर या साधक बाधक चर्चेत टिकटोक बाबत साधक गोष्टी कमी आणि बाधक गोष्टीच जास्त असल्याचे दिसून येत असल्याने भारतात टिकटोक वर बंदी आणण्याच्या मागणीने जोर धरला आहे. घटत्या लोकप्रियतेमुळे येत्या काळात टिकटोकने भारतातून गाशा गुंडाळल्यास आश्चर्य वाटणार नाही हे नक्की.

✍🏻 – अभिजीत सूर्यवंशी (इचलकरंजी)

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–