कोल्हापूरकर आता बांधिलकी जपण्याची गरज..

‘कोल्हापूर’ म्हंटल की सर्वप्रथम प्रत्येकाला आठवते ती माणुसकी. छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक विचारांचे वारसदार असणारे कोल्हापूर हे कोणत्याही संकटाला एकजुटीने सामोरं जाऊन संकटावर मात करत आलं आहे. मात्र आता उद्भवलेल्या कोरोना महामारी समोर ही बांधिलकी जपण्याची खूप गरज आहे.

कोरोनामुळे गेली दोन महिने देश बंद आहे. प्रत्येक ठिकाणी योग्य ती खबरदारी घेत प्रशासन काम करत आहे. नागरिकही त्याला योग्य प्रतिसाद देत आहेत. मात्र कामानिमित्त बाहेरगावी असलेले कोल्हापूरकर आता आपआपल्या घरी येत आहेत. त्यांना शासनाच्या निर्णयानुसार १४ दिवस अलगिकरण कक्षात ठेवलं जातं आहे. तर लक्षणे दिसत नसलेल्यांना घरीच वेगळं राहण्यासाठी सांगितलं जातं आहे.

कामानिमित्त पुणे, मुंबई ला असणाऱ्यांची संख्या खूप आहे पण हे दोन शहरे कोरोना रोगाचे मुख्य केंद्र म्हणजे हॉट स्पॉट आहेत. त्यामुळे या दोन शहरातून येणारे नागरिक नकळत आपल्यासोबत कोरोना रोग देखील घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी १८ रुग्ण असणाऱ्या कोल्हापूरचा दोन तीन दिवसातच रुग्णांचा आकडा शंभरी पार करून पुढे गेला आहे. हा आकडा अजून वाढूही ही शकतो.

कोरोना ला हरवण्यासाठी पाळलेला लॉकडाऊन येणाऱ्या नागरिकांमुळे फेल गेला अशी भावना समजामध्ये निर्माण होत आहे. पण मुळात हा रोग बाहेरच्या देशातून आला आणि तिकडून येणाऱ्यांमुळे पसरला हेही तितकंच सत्य आहे. मुंबई पुण्यातून येणारे आपलेच आहेत पण ते त्यांच्या सोबत अजाणतेपणी कोरोना रोग घेऊन येत आहेत म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे.

काही महिन्यांपूर्वी आलेल्या महापूरामुळे लोकांचे खूप नुकसान झाले त्यांना हातभार लावण्यासाठी मदत म्हणून पुणे मुंबई मधून देखील खूप मदत आली होती हे विसरून चालणार नाही. पण सोशल मीडिया हे द्वेष पसरवण्यासाठी वापरलं जातं आहे. त्यामुळे नकळत शहर विरुद्ध गाव असा छुपा संघर्ष निर्माण होत आहे. सामाजिक अंतर ठेवताना ‘समाज्यात अंतर’ पडणार नाही याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घेणं गरजेचं आहे.

हा रोग जरी शारीरिक असला तरी मानसिक भावना जपणं हे देखील गरजेचं आहे. WHO नुसार या रोगावर औषध नाही पण रुग्णांना मानसिक आधार देणं महत्वाचं आहे.

येणाऱ्या व्यक्तींकडे संशयाने पाहणं चुकीच आहे. पण येणाऱ्यांनी स्वतःहून अलग राहणं हे त्यांचं कर्तव्य आहे. नाहीतर रुग्ण समाजाला घाबरून लपून राहतील आणि परिस्थिती आणखीन वाईट होईल. जपानमध्ये रोगापेक्षा समाज कसं समजावून घेईल याची भीती जास्त तयार झाली आहे.

प्रत्येकाने काळजी घेणं ,नियम पाळणं गरजेचं आहे. कोल्हापूरकर यावेळी देखील एकजुटीने उभे राहतील यात शंका नाही.

✍️ स्व

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–