राजर्षी शाहू महाराज कालातीत महापुरूष: डॉ. लक्ष्मीकांत देशमुख

शिवाजी विद्यापीठात डॉ.जयसिंगराव पवार संपादित पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात बोलताना डॉ. लक्ष्मीकांत देशमुख. व्यासपीठावर (डावीकडून) चंद्रकांत गायकवाड, प्रा. दिलीप पंगू, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. व्ही.एन. शिंदे.

कोल्हापूर, दि. ६ मार्च: महाराष्ट्राला पुरोगामित्वाची दिशा देणारे राजर्षी शाहू महाराज हे कालातीत महापुरूष आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्रातर्फे ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार संपादित ‘राजर्षी शाहू छत्रपती आणि कोल्हापूर (खंड-१२)’ आणि ‘शाहू छत्रपती: राजा आणि क्रांतीकारक (खंड-१३)’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन आज करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाच्या छत्रपती शाहू स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत अनुक्रमे मद्रास विद्यापीठाचे डॉ. चंद्रा मुदलियार आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.एन. वैद्य यांनी दिलेल्या व्याख्यानांचा प्रा. दिलीप पंगू आणि चंद्रकांत गायकवाड यांनी अनुवाद केला. या पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.

डॉ. देशमुख म्हणाले, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी वि.रा. शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांनी महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला पुरोगामित्वाची दिशा दाखविली. त्यांना केवळ राज्यापुरते संकुचित करून चालणार नाही. जिथे जिथे वंचित, शोषितांची चळवळ सुरू आहेत, तिथे तिथे या महापुरूषांचे अस्तित्व असते. ते असले पाहिजे. वर्तमानात महापुरूषांच्या संदर्भाने दोन बाबी प्रकर्षाने घटताना दिसताहेत. एक तर त्यांचे मोठ्या प्रमाणात विभूतीकरण वा दैवतीकरण सुरू आहे. आणि दुसऱ्या बाजूला अतिरेकी विकृतीकरण सुरू आहे. दोन्ही बाबी प्रत्येकजण आपापल्या कृती कार्यक्रमानुसार (अजेंडा) करत आहेत, हे गैरच आहे. वैचारिक प्रतिरोध आवश्यक असला तरी अशा टोकाच्या गोष्टी सामाजिक सौहार्दासाठी धोकादायक असतात.

राजर्षी शाहू महाराज हे विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या कालखंडात भारतीय संविधानामधील तत्त्वांची अंमलबजावणी करणारे द्रष्टे व्यक्तीमत्त्व असल्याचे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, संविधान अस्तित्वात येण्यापूर्वीच संवैधानिक मूल्यांची आपल्या संस्थानात रुजवात करणारे शाहू महाराज एकमेव पूर्वसुरी होते. संविधानाच्या प्रास्ताविकेमधील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांची असोशीने अंमलबजावणी करण्यास प्रोत्साहन त्यांनी दिलेच. शिवाय, संविधानातील बहुतांश मूलभूत अधिकार, निर्देशित तत्त्वांची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने कृतीशील पावले उचलली. त्या दृष्टीने शाहू महाराज म्हणजे महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरले.

प्रकाशित पुस्तकांच्या अनुषंगाने बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, न्या. वैद्यांनी शाहू महाराजांचे चरित्र रंजकपणे मात्र अत्यंत नेमकेपणाने व नेटकेपणाने सांगितले आहे. महाराजांचे थोरपण श्रोत्यांवर बिंबविण्यात ते यशस्वी झाले आहेत. तर चंद्रा मुदलियार यांनी कोल्हापुरातील ब्राह्मणेतर चळवळीचा साद्यंत वेध घेत असताना तिला ‘कोल्हापूर चळवळ’ असे संबोधणे, हेच मुळी या चळवळीचे वेगळेपण सिद्ध करणारे आहे. अत्यंत चिकित्सक मांडणीतून त्यांनी इतिहास संशोधनाचा वस्तुनिष्ठ नमुना सादर केला आहे.

यावेळी डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये या दोन्ही ग्रंथांचे औचित्य तपशीलवार समजावून दिले. ते म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी सुरवातीला शैक्षणिक व सामाजिक सुधारणांची चळवळ आरंभली. त्यावेळी ब्राह्मणांना आपल्या प्रतिष्ठेला बाधा आल्यासारखे वाटले. वेदोक्त प्रकरणामुळे या भावनेला टोकाचे स्वरुप येऊन ब्राह्मणेतर चळवळ अधिक गतिमान झाली. तिचे स्वरुप पुढे अधिक व्यापक बनले आणि तिने सामाजिक, राजकीय सुधारणांसाठी आग्रह धरला. समता, व्यक्तीस्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी कार्यरत झाल्याने पुढे तिने अखिल वंचितांच्या चळवळीचे स्वरुप धारण केले.

प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये अधीक्षक म्हणून काहीही मानधन न देता काम पाहणारे चंद्रकांत गायकवाड आणि प्रा. दिलीप पंगू यांच्या घराण्यात त्यांच्या वकील आजोबांपासून असणारी शाहूनिष्ठा या धाग्यांमुळे पुस्तकाच्या अनुवादालाही त्या शाहूनिष्ठेची किनार लाभली असल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले. दोन्ही अनुवादकांनी केवळ शाहूप्रेमापोटी काहीही मानधन न घेता हे कार्य केल्याबद्दल त्यांचा गौरवही केला.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या चरित्रांचा आजच्या तरुणांनी अभ्यास करण्याची नितांत आवश्यकता आहे. शाहू महाराजांनी समाजातील विविध घटकांच्या उद्धाराचे कार्य केले. त्यामध्ये त्यांनी स्त्रियांसाठी केलेल्या कार्याविषयी केंद्रामार्फत लवकरच सविस्तर प्रकल्प हाती घेण्यात येईल.

कार्यक्रमाच्या सुरवातीला राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. अनुवादक प्रा. दिलीप पंगू आणि चंद्रकांत गायकवाड यांचा शाल, पुष्प व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या साहित्यकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. देविकाराणी पाटील यांनी सूत्रसंचालन केले, सचिन घोरपडे यांनी संयोजन केले तर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–