संत गाडगेबाबा महाराजांचे कार्य प्रेरणादायी- सविता भोसले

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत श्रमदानाने अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिवादन

संत गाडगेबाबा महाराजांच्या कार्याने प्रेरित होऊन दर शुक्रवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. हे अभिनंदनीय तर आहेच शिवाय हेच खरे कृतीतून केलेले अभिवादन आहे, असे गौरवोद्गार जिल्हा ग्राहक मंचच्या अध्यक्ष सविता भोसले यांनी काढले.

येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन कामगार न्यायालयाचे न्यायाधीश पंकज मैंदर्गी यांच्या हस्ते तर श्रीमती भोसले यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी कामगार न्यायाधीश श्री. मैंदर्गी म्हणाले, अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. सर्वांनीच आपला परिसर स्वच्छ ठेवावा. कोव्हिड -19 च्या पार्श्वभूमीवर आपणा सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.

स्वच्छतेबरोबरच या इमारतीमध्ये येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय यासारख्या सुविधाही कराव्यात, असेही ते म्हणाले.जिल्हा ग्राहक मंचच्या अध्यक्ष श्रीमती भोसले म्हणाल्या, श्रमदानाने स्वच्छता मोहीम अधिकारी-कर्मचारी राबवत आहेत. याचा अभिमान वाटतो. अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले आहे. त्यांचीच प्रेरणा घेऊन ही स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या स्वच्छता मोहिमेत सर्वांनीच योगदान द्यावे.

वरिष्ठ भू-वैज्ञानिक ऋषीराज गोस्की यांनी यावेळी दर शुक्रवारी राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेविषयी माहिती दिली. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व वरिष्ठ भू-वैज्ञानिक श्री. गोस्की यांनीही यावेळी प्रतिमेला पुष्प वाहिले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने श्री. मैंदर्गी व श्रीमती भोसले यांना लोकराज्यचा अंक भेट देण्यात आला. यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या तहसिलदार मैमुन्नीसा सनदे, उपलेखापाल मदन घुगे, माहिती सहाय्यक एकनाथ पोवार यांच्यासह विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांनी इमारतीमधील स्वच्छता करून बाबांना अभिवादन केले.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–