परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची अवैध पद्धतीनं सूट देण्याच्या आरोपाखाली मुंबई महानगरपालिकेचे अभियंता निलंबित

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना, संस्थात्मक विलगीकरणातून सूट देण्याच्या बहाण्यानं त्यांच्याकडून पैसे घेऊन, चुकीच्या आणि अवैध पद्धतीनं सूट देण्याच्या आरोपाखाली, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं दुय्यम अभियंत्याला तात्काळ निलंबित केलं आहे.

या प्रकाराची तातडीनं चौकशी  सुरु केली असून याप्रकरणी महानगरपालिका कर्मचाऱ्यासह एकूण तीन जणांविरुद्ध पोलिसात फिर्याद  दाखल केल्याची माहिती, महानगरपालिका प्रशासनानं दिली आहे. हवाईमार्गे प्रवास करुन मुंबईत येणाऱ्या प्रवाशांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. प्रशासन नियमांची कठोर अंमलबजावणी करत आहे असं आवाहन यानिमित्तानं महानगरपालिका प्रशासनानं पुन्हा एकदा केलं आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्यानंतर त्याचा फैलाव रोखण्यासाठी सजगता म्हणून, हवाई मार्गे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना सक्तीनं संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्यासाठी विमानतळावर महानगरपालिका प्रशासनानं कर्मचाऱ्यांची तीन पाळ्यांमध्ये नियुक्तीदेखील केली आहे. 

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–