एम.बी.ए.- यशाचे प्रवेशद्वार

एम.बी.ए. या पदव्युत्तर पदवी विषयी विस्तृतपणे माहिती देणारा डॉ. ताहीर स. झारी यांचा विशेष लेख.

करियर…संपूर्ण विद्यार्थ्यांचा व पालकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा व काळजी करण्यास भाग पाडणारा विषय. बहुतेक विद्यार्थी बारावी  उत्तीर्ण झाल्यानंतर बी.एस.सी., बी.कॉम., बी.ए., बी.बी.ए.,बी.एस.एल., पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन, हॉटेल व्यवस्थापन, ट्रॅवल अँड टूरिझम, फॅशन टेक्नॉलॉंजी, इंटेरीयरडिझाइन, स्पर्धा परीक्षा ई. अश्या प्रकारचे पदवीपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करतात. परंतू, त्यानंतर पुढे काय? हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला किंबहुना त्यांच्या पालकांनाही पडतो. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपण कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचे, याबाबत संभ्रमावस्था असते. आजच्या स्पर्धात्मक काळामध्ये पदवीनंतर विविध विद्याशाखांमध्ये नवनवे आणि उत्तम असे पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांची माहिती करून घेऊन त्या क्षेत्रामध्ये चांगले करिअर करणे शक्य असते.एम.बी.ए. ह्या पदवीनंतर असणार्‍या दोन वर्षांच्या पूर्णवेळ अभ्यासक्रमाची निवड  करून आपल्या करिअरला चांगली दिशा देता येते.

      खरं पाहता, एम.बी.ए. या उच्च शिक्षणामधील पदव्युत्तर पदवी करिता विद्यार्थ्यांचा ओढाही प्रचंड प्रमाणामध्ये दिसून येतो.पण, एम.बी.ए.प्रवेशाबरोबरच अनेक प्रश्नही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उद्भभवत असतात. जसे की, एम.बी.ए. म्हणजे काय ? एम.बी.ए. प्रवेशाचे निकष काय आहेत? एम.बी.ए. अभ्यासक्रमामध्ये कोण कोणते विषय आहेत? त्या सर्व विषयांचा अभ्यास मला झेपेल का? एम.बी.ए. पूर्ण केले नंतर मला कुठे व कोण-कोणत्या ठिकाणी नोकरी मिळेल.?साधारणतः एम.बी.ए. चे शैक्षणिक शुल्क किती आहे? व सगळ्यात महत्त्वाचे की एम.बी.ए. ही पदव्युत्तर पदवी पूर्ण करण्याकरिता आवश्यक असणारी विविध कौशल्येकोण कोणतीआहेत व ती माझ्याकडे आहेत का?

      येथे विद्यार्थ्यांनी व पालकांनी हे समजून घेतले पाहिजे की केवळ अभ्यासक्रमाची पदवी संपादन केली म्हणून चांगले करिअर होते असे नाही तर अभ्यासक्रम योग्य प्रकारे पूर्ण करून आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.सध्याचे गतिमान विश्व हे माहिती तंत्रज्ञानावर अवलंबून असलेने व एम.बी.ए. प्रवेश हे ऑनलाइन असलेने त्याबाबतीतील संपूर्ण तांत्रिक माहिती ही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्ययांच्या संकेतस्थळावर विस्तृतपणे उपलब्ध आहेत्यामुळे या तांत्रिक बाबींना बगल देवून व त्या ही पलीकडे जावून ह्या पदव्युत्तर पदवी बद्दल चर्चा करणे व माहिती करून घेणे गरजेचे वाटते.जर एम.बी.ए. यशस्वीपणे पूर्ण करायचे असेल तर त्याची नियोजनबद्ध व सुरुवातीपासूनच तयारी करणे आवश्यक आहे व हीच या लेखाची मध्यवर्ती संकल्पना आहे. चला, तर या विवीध प्रश्नांवरती थोडक्यात चर्चा करूयात.

      मित्रांनो, एम.बी.ए. ही एक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय मांनाकन असलेली उच्च शिक्षण देणारी व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी आहे.राष्ट्रीय स्तरावरती एम.बी.ए. पदवीची मान्यता ही ए.आय.सी.टी.ई. या शासन मान्यशिखर संस्थेकडून होते.सध्या, आपल्याला असे आढळून येते की एम.बी.ए. शिक्षण देणार्‍या खाजगी संस्थांचे पेव फुटलेले आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यानी व पालकांनी एम.बी.ए. करिता प्रवेश घेताना ए.आय.सी.टी.ई. या शासन मान्य शिखर संस्थेची मान्यता असलेली खात्री करूनच प्रवेश घेणे हे उचित ठरेल व नंतर मनस्ताप होणार नाही. सध्या हा अभ्यासक्रम चालवणाऱ्या अनेक संस्थांमध्ये पुरेसे विद्यार्थीनसल्यामुळे कित्येकदा विद्यार्थी – पालकांना असा प्रश्न पडतो की, खरोखरच एम.बी.ए. करावे का? करिअरच्या संधी उपलब्ध आहेत का? आपल्याला असे आढळून येते की गेल्या काही वर्षांमध्ये एम.बी.ए. सह इतर अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशजागा मोठय़ा प्रमाणावर वाढल्या. यामुळे अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि उपलब्ध जागा यांचा मेळ राहिला नाही आणि उपलब्ध जागा अधिक आणि प्रवेश घेणारे कमी, असे चित्र निर्माण झाले. परंतु, याचा अर्थ एम.बी.ए.ची मागणी कमी झाली असे मुळीच नाही. उलटया स्पर्धात्मक व जागतिकीकरणाच्या  युगामध्ये प्रशिक्षित व्यवस्थापन कौशल्याची व पर्यायाने एम.बी.ए. शिक्षणाची  गरजही वाढलेली आहे.प्रशिक्षित व तज्ज्ञ व्यवस्थापकांची गरज ही फक्त बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा इतर मोठय़ा कंपन्यांनाच नसून प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे.

      एम.बी.ए.च्या अभ्यासक्रमाची दोन वर्ष अगदी विचारपूर्वक रचण्यात आली आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम हा सेमिस्टरपॅटर्नवर आधारित आहे. दोन वर्षा मध्ये एकून ४ सेमिस्टर द्यावे लागतात,ज्या मध्ये दोन सेमिस्टर ही सर्वांसाठी सारखीच असतात. म्हणजे पहिले दोन सेमिस्टर जे आहेत त्यात सर्व विद्यार्थ्यांना सारखेच विषय शिकावे लागतात. याठिकाणि विद्यार्थ्यानीवेगवेगळ्या विषयांच्या मूलभूत संकल्पना समजून घेणे अपेक्षित असते. पण याबाबतीत सर्वसाधारणपणे येणारा अनुभव असा, की असे घडत नाही. केवळ अंतिम परीक्षेमध्ये चांगले गुण मिळावे हा हेतू मनात ठेवून या विषयांकडे पाहिले जाते. वस्तुत: विद्यार्थ्यानी पहिले दोन सेमिस्टर मध्ये प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करणे हे आवश्यक असते.प्रथम वर्षांत शिकण्यासाठी असलेले अनेक विषय म्हणजे द्वितीय वर्षातील वैकल्पिक विषयाचा व एम.बी.ए. पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीचा तो पायाच असतो. त्यामुळे त्या संपूर्ण विषयाचा सखोल अभ्यास करणे गरजेचे ठरते. याकरिता काही कौशल्ये जाणीवपूर्वक आत्मसात करावी लागतात. जसे की चौफेर वाचनाची सवय. विविध विषयांच्या संदर्भग्रंथांचे,वर्तमानपत्रांचे,नियतकालिकाचे, संशोधन ग्रंथांचेवाचन करणे हे सर्वात उत्तम  ठरते.माहिती तंत्रज्ञानाचा  योग्य वापर करून वेगवेगळ्या विषयांसंबंधी चांगल्या लेखांचे व लेखकांचे वाचन करून स्वत:ची आकलनक्षमता व ज्ञान वाढवणे हे सुदधा करणे गरजेचे ठरते. या बरोबरच प्रवेश घेण्याच्या पहिल्या दिवसापासूनच संभाषण कौशल्य व सादरीकरणाची कला याकडे लक्ष देवून आत्मसात केली पाहिजे.कारण असे आढळून येते की एखाद्या विद्यार्थी-विद्यार्थिनीला विषयाचे उत्तम ज्ञान आहे, परंतु, ते संभाषण कौशल्य व सादरीकरणात कमी पडतात आणि त्यामुळे मुलाखतीमध्ये मागे पडतात.त्यासाठी संभाषणाचावसादरीकरणाचानियमित वजास्तीतजास्त सराव करणे हा एक चांगला मार्ग ठरू शकतो.नियमित सराव व जास्तीतजास्त वाचन या बळावर या दोन्ही वर प्रावीण्य मिळवता येते.

      एम.बी.ए.च्या अभ्यासक्रमामध्ये सैद्धांतिक विषयाबरोबरच सेमिनार, ग्रुप चर्चा, केस स्टडीज, समर इंटेर्नशिप प्रोग्राम,व्यवस्थापन थेरीज वर आधारित गेम्स, वर्कशॉप, औद्योगिक अभ्यास दौर्‍याचे नियोजन, इंडस्ट्री-एक्स्पर्ट लेक्चरर्स, व्यक्तिमत्व विकासा करिता विविध उपक्रम, कॅम्पस प्लेसमेंट्स, ई. विविध उपक्रमांचे आयोजनविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता केले जाते.ह्या सर्व उपक्रमांचे वैशिष्ट्य असे आहे की, ह्या सर्व कार्यक्रमांचे नियोजन व आयोजन हे विद्यार्थ्यानीच करायचे असले मुळे त्यांच्यामध्ये विविध कौशल्याचा विकास होतो. आणि यामुळेच एम.बी.ए.ची पदवी ही इतर अभ्यासक्रमापेक्षा वेगळी व महत्त्वाचीठरते.आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये यशस्वी होण्यासाठी व स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या व विविध व्यवस्थापन व प्रशासनामधीलसंकल्पनांची समज, चांगले संभाषण कौशल्य, विश्लेषणात्मक क्षमता, सतत नव-नवीन कल्पना शिकून त्या अमलात आणण्याची क्षमता, निर्णय क्षमता,  नेतृत्वगुण आदी गुणांचीनितांत आवश्यकता असते. पदवीपर्यंतच्या शिक्षणामध्ये हे गुण विकसित करण्याची संधी प्रत्येकालाच मिळते, असे नाही. त्यामुळे एम.बी.ए.ला प्रवेश घेतल्यानंतर स्वत:ची क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करावा लागतो.

      खरे पाहता,एम.बी.ए. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांची खरी परीक्षा सुरू होते.आपल्याला असे आढळून येते की बर्‍याच विद्यापीठामध्ये एम.बी.ए. चा अभ्यासक्रम हा ए.आय.सी.टी.ई. या शिखर संस्थेच्या मॉडेल करिक्युलम चा आधार घेऊन तयार केलेला आहे.एम.बी.ए. ला प्रवेश घेणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याने हे समजून घेतले पाहिजे की, एम.बी.ए. ही पूर्ण वेळ, शिस्तीने,व तन्मयतेने करण्याची पदवी आहे कारण एम.बी.ए अभ्यासक्रमामध्ये सैद्धांतिक अभ्यासक्रमासह प्रात्यक्षिकावरतीही भर देणेत येत असलेने विद्यार्थ्यानी सर्व प्रात्यक्षिके विहित वेळेमध्येपूर्ण करून त्याद्वारे स्वत:च्या कौशल्याचा विकास करणे अपेक्षित असते. बर्‍याच विद्यार्थी-विद्यार्थिनींना असे वाटते किंवा असे सांगण्यात येते की एम.बी.ए.ला प्रवेश घेतल्यानंतरफारसावेळ न देता किंवा फारसा अभ्यास न करता एम.बी.ए. पूर्ण करू शकतो. अश्या गैर समजुतीमुळेविद्यार्थी आपला करियर चा मौल्यवान वेळ वाया घालवतात.तसेच असे आढळून येते की एम.बी.ए.ला प्रवेश घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासून नोकरीच्या शोधात असणारे बरेच विद्यार्थी असतात. तसेच अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपल्याला चांगल्या कंपनी मध्ये संधी  मिळेल किंवा नाही, या विवंचनेत अनेकजण असतात.हा उद्देश जरी योग्य असला तरी आवश्यक ती संधी मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता आपल्यात यावी, म्हणून जाणीवपूर्वक,नियोजनबद्ध व सुरुवातीपासून प्रयत्न करणे हे आवश्यक असते, हे समजून घ्यायला हवे.

      सारांश:विद्यार्थ्यानी समजून घेतले पाहिजे की,एम.बी.ए.अभ्यासक्रम पूर्णकेलेनंतर लगेचच एखाद्या मोठय़ा कॉर्पोरेट ब्रॅंड मध्ये, चांगल्या पगाराची नोकरीलागेल. परंतु, यशस्वी रित्या पूर्ण वेळ मन लावून एम.बी.ए. पूर्ण केलेल्या व त्याद्वारे स्वत:ला सिद्ध केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या, व्यवसायाच्या व स्वयंरोजगाराच्या पुष्कळ,अतिशय चांगल्या व सर्वोत्तम  संधी उपलब्ध आहेत. एम.बी.ए. चीदोन वर्षे ही पुढील करिअरचा पाया आहेत. ही दोन वर्षे गंभीरपणे घेतल्यास आणि उपलब्ध वेळेचे नियोजनबद्ध पुरेपूर वापर केल्यास यशस्वी करिअर करता येणे हे प्रत्येकाला शक्य आहे. विशेषत: मार्केटिंगमॅनेजमेंट(विपणन) मध्ये ब्रॅंडिंग, प्रमोशन,प्रॉडक्ट डेव्हलपमेंट,डिस्ट्रीब्युशन आणि सप्लाय, लॉजिस्ट‌कि,मार्केट रिसर्च, मार्केटिंग स्ट्रॅटेजी,बिझनेस डेव्हलपमेंट, जाहिरात सेवाक्षेत्र,रीलेशनशिप मार्केटिंग,रीटेल तसेच फायनान्स मध्ये बँकिंग सेक्टर,कॉर्पोरेटफायनान्स,इन्व्हेस्टमेंट बँकर, स्टॉक मार्केट ट्रेडर,इक्विटी रिसर्चर्स तसेच मनुष्यसंसाधन व मनुष्यबळ, माहिती (बिझनेस अॅनलिस्ट)व इतर अनेक क्षेत्रामध्ये प्रचंड संधी उपलब्ध आहेत.या ठिकाणी दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे करिअर आणि तुमची आवड. या दोन्हीदृष्टीनेतुम्हाला अनुकूल असं क्षेत्र निवडणं गरजेचं आहे.मात्र यासाठी केवळ वरवरचा दृष्टिकोन सोडणे आवश्यक आहे. एम.बी.ए. अभ्यासक्रमाचा मौल्यवान  वेळ खऱ्या अर्थाने सत्कारणी लावायचा असेल तर कठोर मेहनत करणे हे क्रमप्राप्त आहे. याला दूसरा पर्याय नाही. आजच्या जागतिकीकरणाच्या व स्पर्धात्मक युगात एम.बी.ए. या पदव्युत्तर पदवी कडे व्यापक व सन्मानाच्या दृष्टीने कॉर्पोरेट जगताकडून पहिले जाते आणि म्हणूनच २१ व्या शतकामध्ये प्रवेश केलेल्या व आपले आयुष्य व भविष्य व्यवसायाभिमुख व व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवीद्वारे व प्रशिक्षणा द्वारे सुरक्षित व उज्वल करू ईच्छिण्यार्‍या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांना एम.बी.ए. हा उत्तमच नव्हे तर सर्वोत्तम पर्याय आहे.

धन्यवाद!

_______******_______

डॉ. ताहीर स. झारी (मो. नं. ९२८४५७२५२७)
      देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर.
      (लेखक सहाय्यक प्राध्यापक व व्यवस्थापन क्षेत्रा मधील तज्ञ आहेत.)

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–