सामान्यजनांचे ‘अण्णा’

देशभक्त पद्मश्री डॉ. रत्नाप्पा कुंभार यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. ताहीर स. झारी यांचा विशेष लेख

” ज्ञानाच्या वटवृक्षांवरती…. गोंदुन धुक्याचे वेल …
ते मिटुनी नेत्र म्हणाले … ज्ञानफुल उमलेल ..
अवचित या पारंब्यावरूनी … ते धुक्यात गेले थेट …
निरंतर ठेवुनी मागे … ज्ञानफुलांचे बेट !!! “

देशभक्त पद्मश्री डॉ. रत्नाप्पा कुंभार ! आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचे शिल्पकार ! ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अंजिक्य योद्धा ! संस्थाने विलीनीकरण चळवळीमधील प्रथम सेनानी ! कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते व हरितक्रांतीचे प्रणेते ! सहकारातुन समृध्दीची गंगा शेतकऱ्यांच्या शेता – शिवारात खेळविणारे आधुनिक भगीरथ ! अष्टपैलु व्यक्तीमत्वाचे युगंधर ! ‘कायक वे केलास’ अर्थात श्रम हाच स्वर्ग मानुन आयुष्यभर पायाला भिंगरी लावुन समाज घडविणारे महान… महान लोकनेते! कौन्सिल ऑफ एज्युकेशनची स्थापना करून पश्चिम महाराष्ट्राचा वैचारीक,  सामाजिक व आर्थिक कायापालट करणारे थोर विचारवंत व शिक्षणमहर्षी !

मानवी जीवनात अधिक चांगले तसेच समाजास वैचारीक दिशा देण्याचे कार्य कसे करता येईल हा एकच ध्यास सच्च्या नि द्रष्ट्या लोकनेत्यांना असतो आणि या आंतरीक जाणिवेतुनच व ध्यासातुनच त्यांची समाजापुढे आदर्श ठरेल अशी समर्पित कार्यशैली निर्माण होते. सामान्यजनांविषयीचा अंर्तग्रामीचा कळवळा त्यांना कार्यप्रवण करतो. आपणा सर्वांचे ‘अण्णा’ अश्या लोकनेत्यापैकी एक. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांशी परकीय सत्तेशी लढा देणाऱ्या अण्णांनी स्वातंत्र्योत्तर काळात दारिद्रय, अज्ञान, विषमता या समाज पुरूषाला जर्जर करणाऱ्या विषाणूंशी लढा देण्यासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, औद्योगिक, सहकार अश्या विविध कार्यक्षेत्रांची निवड केली व आपल्या कार्याचा सखोल ठसा उमटविला. “सामान्यजनांचा उद्धार” हा त्यांचा समग्र कार्याचा केंद्रबिंदु होता.

अण्णांचा जीवनप्रवास पाहीला तर “सुजलाम – सुफलाम” चा अर्थ सापडतो – समजतो. १९३६ ला फैजपुर काँग्रेस अधिवेशनाला अण्णा उपस्थित राहीले नि तेथुन त्यांच्या देशसेवेला वेग आला. मिठाच्या सत्याग्रहामुळे भारतातील राजकीय वातावरण तापले होते. २५ डिसेंबर १९३८ रोजी कोल्हापूरात शेत-सारा कमी करण्याच्या मागणीसाठी संस्थानाविरूध्द मोर्चा निघाला त्याकाळी अस्तित्वात असलेल्या स्थानिक संस्थानाचे राज्यात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनामध्ये अण्णा आघाडीवर होते. १९३८ ला स्थापन झालेल्या प्रजापरिषदेचे ‘ सरचिटणीस’ पद त्यांनी समर्थपणे सांभाळले.

जत, जमखंडी, अक्कलकोट अशी एकवीस संस्थाने अण्णांच्या नेतृत्वाखाली चळवळीमध्ये भारतीय संघराज्यात विलीन झाली. ब्रिटीशांनी भारत देशातील ५६५ संस्थानातील राजेशाही अबाधित ठेवून भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती. यामुळे अनेक संस्थानानी विलीनीकरण करण्यास नकार दिला होता. यामुळे सर्वकष स्वातंत्र्य प्राप्तीचे स्वप्न अपुरे राहण्याचा धोका निर्माण झाला होता. परंतु, अण्णांच्या समर्थ व सक्षम नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील सगळी संस्थाने भारतात विलीन झाली. या अश्या अनेक चळवळीमध्ये ५ वर्षे भुमिगत राहुन स्वातंत्र्य लढा गतिमान व यशस्वी करणाऱ्या अण्णांचे योगदान “ देशभक्त”  या उपाधीतुनच अभिव्यक्त होते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अण्णांनी निखळ समाजकल्याणाच्या हेतुने स्वत : ला पुर्णपणे वाहुन घेतले. निमशिरगांव येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अण्णांनी “ग्रामीण अर्थव्यवस्था पायाभुत मानल्याशिवाय कोणतीही योजना यशस्वी होणार नाही.” हे सहजी जाणल्याने सहकाराद्वारे सामान्य माणसांच्या जीवनात क्रांती घडवून आणली. १९५५ मध्ये १४ कोटींचा “पंचगंगा” सहकारी साखर कारखाना उभा करून कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण कायापालट घडवून आणला. या कारखान्याने विविध लोकोपयोगी कामे हाती घेवून संस्कार-संपन्न समाजघडणीचे कार्य चालविले.

“शेतकरी सुखी तर देश सुखी” हा महात्मा फुले यांचा विचार अण्णांच्या ठायी होता. शेती, शेतकरी, कष्टकरी यांच्याविषयी त्यांच्या अंत:करणात विलक्षण जिव्हाळा होता. म्हणूनच साडे-सात कोटींच्या ५९ उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून ५६ हजार एकर जमीन हिरवीगार केली. कृषि उद्योगावर आधारीत विविध उद्योग निर्माण केले. अण्णांच्या सहकार चळवळीचे अंतिम ध्येय “सामान्यजनांचे कल्याण” हे होते. त्यांच्या सहकारात वैर, द्वेष, अहंकार, भ्रष्टाचार यांना स्थान नव्हते. अण्णा म्हणत, “सहकारी क्षेत्रातील कार्यकत्यांची अशी प्रार्थना पाहिजे की, सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी पावित्र्य दे, हिम्मत दे आणि हे शुध्द भावनेने जाणले तर जमा-खर्च लिहीताना चुक होणार नाही.” असा सहकार अण्णांना ‘ देव’ वाटतो.

अन्न, वस्त्र, निवारा इतकीच शिक्षण ही महत्वाची गोष्ट माननाय अण्णांनी १९५१ मध्ये ‘कौन्सिल ऑफ एज्युकेशन’ ची स्थापना करून मोजक्याच पण दर्जेदार शिक्षण संस्था निर्माण केल्या. समाजाच्या, काळाच्या गरजा ओळखुन अण्णांनी शहाजी लॉ कॉलेज, कॉलेज ऑफ कॉमर्स, नाईट कॉलेज अशी वैशिष्ट्यपूर्ण महाविद्यालये उभी केली. प्रतिकुल परिस्थितीतील शेकडो मुला-मुलींना, प्रौढ स्त्री-पुरूषांना शिक्षणाची सुसंधी नाईट कॉलेजची स्थापना करून अण्णांनी उपलब्ध करून दिली. १९८५ साली त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी.लिट. पदवी प्रदान करून त्यांचा गौरव केला.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम एम.बी.ए.या व्यवसायाभिमुख व रोजगाराच्या भरपुर संधी उपलब्ध असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची १९७१ साली सुरूवात केली. अण्णांच्या मते “शिक्षण ही एक अखंड जीवन प्रक्रिया आहे. जीवनातील नव्या अनुभवांचा अर्थ समजावून घेणे व समजावून देणे म्हणजे शिक्षण होय. व्यवसायाभिमुख उच्च शिक्षण आजच्या तरूण पिढीला मिळाल्यास समाजाचा सर्वांगीण विकास सहजपणे साध्य करता येईल, या विचारातून साकारलेल्या एम.बी.ए. विभागाची घौडदौड ही विपणन व्यवस्थापन, मानव संसाधन, आर्थिक व तंत्र व्यवस्थापन अश्या विविध विषयावर ज्ञानदानाचे व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन आजच्या तरूण पिढीमध्ये नेतृत्वाचे बीज संकरीत करीत आहे.

अण्णांनी शिक्षणक्षेत्र राजकारण व भ्रष्टाचार यापासून अलिप्त ठेवले. अण्णांच्या या तत्वनिष्ठेचे काटेकोरपालन आजही या शिक्षण संस्थामधून होते. अण्णा राजकारणात होते, तरी रूढार्थाने राजकारणी नव्हते. त्यांनी विविधप्रसंगी केलेल्या भाषणामधून त्यांच्यातील सहृदय, सुसंस्कत, समाजचिंतक अभिव्यक्त होतो. त्यांच्या आचार, विचार व उच्चारात एकरूपता होती. प्रामाणिकपणाला प्रणाम करणाऱ्या अण्णांना विनाकष्टाची प्रतिष्ठा मिळवु पाहणारी अप्रामाणिक माणसे देशाची खरी शत्रु वाटत. मानवी जीवनात अण्णांनी सुसंस्कारांना अत्यंत महत्व दिले.

भारताच्या घटना समितीचे सदस्य असणाऱ्या अण्णांचा पत्रव्यवहार प्रचंड होता. समाजातील विविध क्षेत्रांमधील गुणवंतांना त्यांच्याविषयी केवळ वर्तमानपत्रात वाचून अण्णा पत्र पाठवून अभिनंदन करीत. प्रोत्साहीत करीत. अण्णांच्या प्रगल्भ, सात्वीक, उदात्त जीवनदृष्टीचे, माणसावरच्या खऱ्या-खुऱ्या प्रेमाचे हे द्योतक ! सदृढ , निकोप समाजनिर्मितीसाठी अण्णा किती वेग-वेगळ्या पातळ्यावर प्रयत्नशील होते हे पाहुन मन अचंबित होते. कृतज्ञतेने भरून येते. हजारो-लाखो माणसांच्या अंत:करणात अण्णांना अढळपद लाभले ते यामुळेच! अण्णा चिरंतर होते…. अण्णा निरंतर आहेत!

 डॉ. ताहीर स.झारी ( मो. नं. ९२८४५७२५२७ )
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स , कोल्हापूर.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–