#LetterToBabasaheb या मोहिमेत सहभागी होऊन मंत्री जयंत पाटील यांनी केले बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त #LetterToBabasaheb ही मोहीम राबवून सर्वांनी बाबासाहेबांना घरातून पत्र पाठवून अभिवादन करावे असे आवाहन करण्यात आले होते.

आजच्या दिनानिमित्त #LetterToBabasaheb या मोहिमेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील सहभागी होऊन बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन केलंय. जयंत पाटील पत्रात म्हणतात,

परमपूज्य बाबासाहेब,

देशभरातील कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत. तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत. म्हणून देश हितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित आहे. इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी आम्ही अविरत कार्य करू हे आमचे ध्येय आहे. उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा एक प्रबळ वारसा आहे. या विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मूल्यांचे आम्ही रक्षण करू.

चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे. महापरिनिर्वाण दिनी तुम्हाला विनम्र अभिवादन!

आपला,
जयंत पाटील

या मोहिमेला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. अनेकांनी आपले विचार पत्रात मांडत चैत्यभूमी च्या पत्यावर पत्र पाठवली आहेत. या अनोख्या मोहिमेस प्रतिसाद देऊन चैत्यभूमीवर गर्दी न करता अभिवादन केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–