“स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा निरोप”

✍ स्व…


महाभारत, रामायण पाहण्यासाठी जसे लोकं रानातील, घरातील कामे आटोपून टीव्हीसमोर बसायचे तसेच “स्वराज्यरक्षक संभाजी” ही मालिका बघण्यासाठी आबालवृद्ध आधीपासूनच तयार असायचे. रात्रीचे ९ वाजले की रिमोट घेऊन मालिका लावली जायची आणि संपूर्ण परिवार ही मालिका एकत्र बघत बसायचे.
काल या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. तीन वर्षांपासून सुरू असलेली ऐतिहासिक मालिका सर्वांनाच खूप काही शिकवून गेली. या मालिकेने छ. संभाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहचवला. त्यांचा पराक्रम, कीर्ती सर्वांसमोर आणली.
स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका २०१७ पासून झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनप्रवासावरच्या या मालिकेची कथा प्रतापराव गंगावणे यांनी लिहिली होती तर डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंबा क्रियेशन हे निर्माते होते.
छत्रपती संभाजीराजे आणि त्यांच्या पत्नी महाराणी श्रीमंत येसूबाई यांचा त्याग, धैर्य, निष्ठा, रयतेसाठी असणारे प्रेम डॉ. अमोल कोल्हे आणि प्राजक्ता गायकवाड यांनी त्यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. सर्वच कलाकार आणि मालिकेची संपूर्ण टीम यासाठी अहोरात्र कष्ट करत होती.
बालपणापासून शेवट पर्यंत दाखवण्यात आलेल्या या मालिकेचा शेवटचे काही भाग मन सुन्न करणारे होते. अनेकांनी संभाजी महाराजांचा दाखवण्यात येणारा छळ सहन न झाल्याने मालिकेकडे पाठ फिरवली होती. प्रेक्षकांनी मालिकेवर खूप प्रेम केलं.
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लिहितांना जाणीवपुर्वक अफवा जोडुन बदनाम करणारा खोटा इतिहास खोडुन काढत सर्वोत्तम योद्धाचा खरा इतिहास जगासमोर आणल्याबद्दल सर्व स्तरातून मालिकेचे आणि कलाकारांचे कौतुक होत आहे.

——————————–
🤝 लोकआवाज चे न्यूज,जॉब्स व इतर बरेच अपडेट आपल्या व्हॉट्सअँप मिळवण्यासाठी आजच पुढील लिंक वरून जॉईन व्हा
http://connect.lokaawaj.com
———————————–